- बेळगाव पोलिसांची धडक कारवाई
बेळगाव : शहरात अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर कृत्यांविरोधात बेळगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी ७२ हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले असून, धारदार शस्त्र बाळगणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई केली आहे. या तिन्ही प्रकरणांत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पहिल्या कारवाईत एपीएमसी पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बीआयएमएस रुग्णालय परिसरात छापा टाकला. यावेळी अफजल रशीद बेपारी (वय ४१, रा. उज्ज्वल नगर, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. तो आर्थिक फायद्यासाठी हेरॉइनची विक्री करत असल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून ३.६० ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे ७२ हजार रुपये आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम २१(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत मार्केट पोलिसांच्या अँटी-स्टॅबिंग पथकाने २३ नोव्हेंबर रोजी हनुमान ट्रेडर्स गोदामाच्या प्रवेशद्वाराजवळ मोहम्मद झिया सय्यद शेख (वय २६, रा. काकर गल्ली, बेळगाव) याला पकडले. त्याच्याकडे सार्वजनिक ठिकाणी बाळगलेली धारदार सुरी आढळून आली. तिचा वापर गुन्हेगारी कृत्यासाठी करण्याचा त्याचा उद्देश असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी सुरी जप्त करून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५४/२०२६ नोंदवला आहे. त्याच्यावर शस्त्र कायदा १९५९ मधील कलम २७(१) आणि कर्नाटक पोलीस कायदा १९६३ मधील कलम ९७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, उद्यमबाग पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याप्रकरणी प्रशांत दशरथ सुतार (वय २९, रा. गंगई गल्ली, मजगाव, बेळगाव) याच्यावर कारवाई केली. औद्योगिक क्षेत्रातील पराठा कॉर्नरजवळ तो सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२६ अन्वये कर्नाटक उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम १५(ए) आणि ३२(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तिन्ही कारवायांमध्ये सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे बेळगावचे पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांनी कौतुक केले आहे. शहरातील बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली आहे.








