• शहापूर आणि माळमारुती पोलिसांची स्वतंत्र कारवाई
  • ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त

बेळगाव : शहरात अवैध मटका जुगाराविरोधात पोलिसांची कारवाई सुरूचं असून, २० नोव्हेंबर रोजी शहापूर आणि माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत मटका जुगाराचे अड्डे चालविणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९ हजार ८०० रुपये रोख आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पहिली कारवाई शहापूर पोलिसांनी खासबाग परिसरातील मरगम्मा गल्ली येथे केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगारावर छापा टाकून संतोष नारायण कणुकाळे (वय ५३) आणि शुभम संतोष कणुकाळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही आकड्यांवर आधारित मटका जुगारासाठी लोकांकडून पैशांच्या पैजा स्वीकारत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडून २ हजार ३८० रुपये रोख आणि मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.

चौकशीदरम्यान जुगारातून जमा होणारी रक्कम बेळगावमधील कामत गल्ली येथील गजानन गराडे नामक व्यक्तीकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) अन्वये गुन्हा क्रमांक १४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई माळमारुती पोलिसांनी यमनापूर गावातील कोल्हापूर हॉटेलजवळ केली. सार्वजनिक ठिकाणी मटका जुगाराच्या पैजा स्वीकारणाऱ्या होळेप्पा शंकर गस्ती (वय ३२, रा. यमनापूर) आणि अर्जुन परशुराम कोळी (रा. पाटील गल्ली, कंग्राळी) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७ हजार ४२० रुपये रोख आणि मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(३) अन्वये गुन्हा क्रमांक २५३/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.