- पाणीवापरात १० टक्के कपातीचे संकेत
- संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा
बेळगाव : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात येत असून, शहरी भागातील पाणीवापरात १० टक्के कपात करण्याचे नियोजन आहे. तसेच नदीकाठच्या परिसरातील वीजकपात वाढवण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
सध्या हिप्परगी बॅरेजमध्ये २.५ टीएमसी, तर मलप्रभा जलाशयात १४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करून उपलब्ध पाणीसाठ्यातून केवळ पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी नदीकाठच्या भागात आठवड्यातून दोन दिवस केली जाणारी वीजकपात तीन दिवसांपर्यंत वाढवण्याबाबत प्रशासन विचार करत आहे.
मलप्रभा नदीतून धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती आणि रोन या शहरांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज २०० ते २५० क्युसेक्स पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर आणि पुनर्वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी शहरी भागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.
आगामी काळात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.








