• मध्यवर्ती म. ए. समितीचा गनिमी काव्याने आंदोलनाचा निर्धार
  • मराठी भाषिकांची ताकद दाखवून देणार

बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. जरी प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही तरी गनिमी काव्याने मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार समितीने केला आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार (दि. १७) रोजी मराठा मंदिरात झाली. अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत महामेळाव्यासह सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीविषयी चर्चा झाली.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे म्हणाले, लोकांच्या सहभागामुळेच गेल्या सत्तर वर्षांपासून चळवळ सुरू आहे. प्रशासनाने अनेक निर्बंध आणले तरी समितीने लढा सुरूच ठेवला आहे. काळ्या दिनाच्या फेरीत युवा वर्गाने मराठी माणसांची ताकद दाखविली आहे. प्रशासनाला चांगलाच हिसका दिला आहे. आता विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महामेळाव्याला प्रशासन परवानगी देणार नाही, असे गृहित धरूनच लढा करावा लागणार आहे. त्यासाठी गनिमी कावा वापरावा लागणार आहे. या आंदोलनात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, महामेळाव्याला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसली, तरी ती नाकारल्याचे पत्रही दिलेले नाही. त्यामुळे अधिवेशनाविरोधात आंदोलनासाठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मराठी माणसाला खंबीर उभे राहण्याची वेळ आता आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आंदोलन हाच पुरावा असणार आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलन करावेच लागणार आहे. प्रशासनाने कितीही खटले घातले तरी ते लढविण्याची तयारी आमची आहे. त्यामुळे मराठी जनतेने आणि नेत्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

बैठकीत राजाराम देसाई, अनिल पाटील आणि डी. बी. पाटील यांनीही महामेळाव्याच्या आयोजनाला पाठिंबा दर्शविला. समितीतील श्रेयवाद आणि अंतर्गत मतभेदांमुळे संघटनेच्या कामावर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नेत्यांनी आपापसातील मतभेद दूर करून सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आबासाहेब दळवी यांनी प्रशासनाने परवानगी नाकारल्यास न्यायालयीन मार्गाचा विचार करण्याची सूचना केली. तर एम. जी. पाटील यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. महामेळाव्यासाठी सरदार मैदान, धर्मवीर संभाजी महाराज चौक आणि संभाजी उद्यान या ठिकाणी परवानगी मागण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी गोपाळ पाटील, जगन्नाथ बिर्जे, ॲड. एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, शिवाजी खांडेकर, रणजित चव्हाण-पाटील, नारायण सांगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद महामेळाव्यातही दिसून यावा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. महामेळाव्याच्या पुढील नियोजनासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली असून, यासंदर्भातील पुढील निर्णय एक तारखेला सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे.

बैठकीला खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, मल्लाप्पा गुरव, आर. एम. चौगुले, रावजी पाटील, आर. के. पाटील, बी. डी. मोहनगेकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.