बेळगाव : येळ्ळूर गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलातील रायफलमन दिनेश गंगाराम कार्लेकर यांनी आंतरराष्ट्रीय अश्वारूढ टेंट पेगिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे येळ्ळूरसह संपूर्ण बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जॉर्डनमधील अकाबा येथे १२ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत इंटरनॅशनल टेंट पेगिंग फेडरेशनच्या (ITPF) वतीने विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिनेश कार्लेकर यांनी भारतीय संघातून सहभाग घेत आपल्या कौशल्याची छाप पाडली.
या स्पर्धेत त्यांनी वैयक्तिक लान्स टेंट पेगिंग प्रकारात कांस्यपदक मिळवले. तसेच सांघिक गटातील रिंग अँड पेग (लान्स), लेमन अँड पेग (तलवार) आणि रिले (लान्स व तलवार) या तिन्ही प्रकारांतही कांस्यपदकांची कमाई केली. याशिवाय लान्स आणि तलवार या दोन्ही प्रकारांचा समावेश असलेल्या वैयक्तिक सर्वांगीण अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी कांस्यपदक पटकावले.
दरम्यान, विश्वचषकाच्या एकूण सांघिक गुणतालिकेत भारतीय संघाने ४३६ गुणांसह पाचवे स्थान मिळवले. दिनेश कार्लेकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक राज्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे येळ्ळूर गावाची कीर्ती जागतिक स्तरावर पोहोचली असून, त्यांचे यश नवोदित खेळाडूंना निश्चितच प्रेरणा देणारे आहे.








