बेळगाव : शहराचा नियोजनबद्ध विकास साधण्यासह सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी मास्टर प्लॅन-२०२१ मधील बांधकाम नियमांमध्ये आवश्यक बदल करावेत, अशी मागणी क्रेडाई बेळगावच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बुडा अध्यक्ष आमदार राजू सेठ, आमदार अभय पाटील, माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि महापालिका आयुक्त यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. पालकमंत्री जारकीहोळी यांनी निवेदन स्वीकारून हा विषय बुडाच्या आगामी बैठकीत चर्चेसाठी मांडण्याचे आश्वासन दिले.

क्रेडाईने निवासी बांधकामासाठी एफएआर (फ्लोअर एरिया रेशो) ४.५० करण्याची मागणी केली आहे. तसेच हाय-राईज इमारतींची व्याख्या सध्याच्या १५ मीटर उंचीवरून २४ मीटरपर्यंत वाढवावी आणि २४ मीटरपेक्षा कमी उंचीच्या इमारतींना कमी उंचीच्या बांधकामाचे नियम लागू करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.

याशिवाय इमारतींमध्ये दोन बेसमेंट बांधण्यास परवानगी द्यावी, स्टॅक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि हाय-राईज इमारतींसाठी भूखंडाची किमान रुंदी २१ मीटरवरून १८ मीटर करावी, अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

या प्रस्तावित सवलती चार हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांसाठी लागू कराव्यात, अशीही क्रेडाईची भूमिका आहे. संघटनेचे अध्यक्ष युवराज हुलजी आणि प्रशांत वांडकर यांनी या मागण्या मांडल्या आहेत.