- नेतृत्व, सेवा आणि मैत्रीच्या नव्या पर्वाची सुरुवात
बेळगाव : युवकांमध्ये नेतृत्वक्षमता विकसित करण्याबरोबरच सामाजिक कार्याची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने रोटरॅक्ट क्लब ऑफ भरतेश होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने आयोजित या क्लबचा चार्टर स्थापना सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हा प्रांतपाल डॉ. लेनी डी कोस्टा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याहस्ते नूतन क्लबचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पदभार सुपूर्द केला.
समारंभाला सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन जयदीप सिद्धण्णावर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जमादळे आणि क्लबच्या मार्गदर्शक डॉ. राजश्री मिसाळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी नव्या टीमचे अभिनंदन करून आगामी कार्यासाठी मार्गदर्शन केले.
रोटरॅक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व करण्याची, संघभावना जोपासण्याची आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणार आहे. विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा या क्लबचा प्रयत्न राहणार आहे.
नव्या क्लबच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि नेतृत्वविषयक वाटचालीला प्रोत्साहन मिळणार असून, नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.








