- बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
बेळगाव : द. म. शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या ज्ञानेश संदीप बामणे याने फुटबॉल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आणखी एक यश संपादन केले आहे. जिल्हा फुटबॉल संघात स्थान मिळवल्यानंतर त्याची बेंगळुरू येथे होणाऱ्या २०२६ च्या कर्नाटक मिनी ऑलिम्पिक स्पर्धेतील १४ वर्षांखालील गटासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ज्ञानेश नुकताच बेंगळुरूकडे रवाना झाला.
बेळगाव तालुक्यातील गोजगे या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या ज्ञानेशने आपल्या खेळाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे वडील संदीप बामणे हे नवहिंद पतसंस्थेत शाखाप्रमुख म्हणून कार्यरत असून, निवृत्त मुख्याध्यापक केदार गुंडू बामणे यांचा तो नातू आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ५८ व्या फादर एडी फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये ज्ञानेशने आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विशेषतः जैन हेरिटेज संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या सत्रात मिळालेल्या फ्री किकवर त्याने अप्रतिम गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला.
ज्ञानेशच्या या फ्री किकचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अवघ्या एका आठवड्यात देशभरातील सुमारे १० लाख फुटबॉल चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहिला, तर दोन लाखांहून अधिक जणांनी त्याला पसंती दर्शवली. त्यामुळे त्याच्या खेळाची आणि कौशल्याची सोशल मीडियावर विशेष चर्चा होत आहे.
आता कर्नाटक मिनी ऑलिम्पिक स्पर्धेतही ज्ञानेश चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा फुटबॉलप्रेमींकडून व्यक्त होत आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी क्रीडाप्रेमींसह अनेकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जात आहेत.
ज्ञानेशच्या या यशामागे ज्योती सेंट्रल स्कूलचे प्रशिक्षक मनोज जाधव, रेग फसीचे रेगो सर तसेच वडील संदीप बामणे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले आहे.








