• पोलीस कॉन्स्टेबलसह सात जणांना अटक
  • २.३९ कोटींची रोकड जप्त

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात २.६८ कोटी रुपयांच्या लुटमारीचा कट रचल्याप्रकरणी, माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी यांचे अंगरक्षक (गनमन) म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

आरोपी चिदानंद सिद्धारुढ कुरबेट याने, पीडितांना त्यांचे पैसे अनेक पटींनी वाढवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना फसवले. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी मुदलगी तालुक्यातील संगनकेरी गावातील एका शेतातील शेडमध्ये त्यांना लुटण्याचा कट रचला.

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीने पीडितांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून, त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून पळून जाण्याचा बेत आखला होता. मात्र, पीडितांनी प्रतिकार करत हल्लेखोरांवर नियंत्रण मिळवले आणि त्यांना पोलिसांच्या हवाली केले.

या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी २.३९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी चिदानंदला त्वरित सेवेतून निलंबित केले आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हा कट केवळ संबंधित पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या साथीदारांचे वैयक्तिक गुन्हेगारी कृत्य होते; या घटनेशी आमदार रमेश जारकीहोळी यांचा कोणताही संबंध नाही.