- टिळकवाडीत चौघांना अटक ; सीसीबी पोलिसांची कारवाई
- बनावट नोटा, एअर पिस्तूल आणि पाच मोबाईल जप्त
बेळगाव : ऑनलाईन व्यवहाराच्या बदल्यात मोठी रोख रक्कम देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा बेळगावच्या सेंट्रल क्राईम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून बनावट नोटा, एअर पिस्तूल आणि मोबाईल फोनसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. शिवलिंगय्या रचय्या गणाचारी (वय २८, रा. मुगळखोड, ता. रायबाग) , सागर लक्ष्मण किल्लेकेत (वय ३२ , रा. कृष्णनगर, अंकली, ता. चिक्कोडी) विनायक गणपती नोकरे (वय २७, रा. वडगोळ, ता. चिक्कोडी) , शिवानंद कल्लाप्पा मुनवल्ली (वय २९, रा. चंदरगी, ता. रामदुर्ग) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. अशोक मरेप्पा तवणचे यांच्या मालकीच्या घराच्या तळमजल्यावरील एका खोलीत सीसीबी पथकाने छापा घातला. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ५ कोटी रुपयांचे ऑनलाईन व्यवहार करून त्याबदल्यात ३ कोटी रुपये रोख देण्याचे आमिष दाखवत होते. ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवल्याचे भासवणारे बनावट संदेश दाखवून समोरील व्यक्तींचा विश्वास संपादन करण्याची त्यांची योजना होती.
यातील चौथ्या आरोपीने आपल्याकडे ३ कोटी रुपये रोख असल्याचा बनाव केला होता. विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी त्याने ‘चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया’ असे छापलेल्या मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा खऱ्या चलनाप्रमाणे दाखवल्या. अशा प्रकारे मोठ्या रकमेच्या व्यवहाराचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचा कट आखण्यात आला होता.
छाप्यादरम्यान पोलिसांनी ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या १० बनावट नोटा, ५ हजार रुपये रोख, एक एअर पिस्तूल, विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन आणि बनावट बँक स्टेटमेंट जप्त केले. जप्त साहित्याची एकूण किंमत सुमारे ३५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६२, ३१६(२), ३१८(४), ३३६(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच सीसीबी पथकातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.








