• शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

बेळगाव : दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेचे साहित्य आणि दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने शहरातील प्रमुख व्यापारी पेठा ग्राहकांनी फुलून गेल्या होत्या.

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य, पणत्या, रांगोळी, आकाशकंदील, विद्युत रोषणाईचे साहित्य, घरगुती सजावटीच्या वस्तू तसेच विविध पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढली होती. दुपारनंतर गर्दीत आणखी भर पडल्याने बाजारपेठा हाऊसफुल्ल झाल्या होत्या.

खरेदीसाठी नागरिकांची झालेली गर्दी आणि वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बाजारपेठ परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना तसेच नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागले होते. एकीकडे दिवाळीच्या खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला होता, तर दुसरीकडे वाढलेल्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा चांगलाच खोळंबा झाला होता.