- रंगीबेरंगी आकाशकंदिल ठरताहेत ग्राहकांचे मुख्य आकर्षण
बेळगाव : दिवाळी सणाचे आगमन होताच बेळगाव शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सणासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्याकरिता नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असून, शहरातील प्रमुख बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलल्या आहेत. गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, किर्लोस्कर रोड आणि शनिवार खुट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून खरेदीची लगबग वाढली आहे.
इंधन दरवाढीमुळे भाजीपाला, फळे आणि फुलांच्या किमतींमध्ये वाढ झाली असली, तरी सणाच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. एपीएमसीमधील व्यवहारांसह घाऊक फुलबाजार आणि भाजीपाला बाजारातही चांगली उलाढाल सुरू आहे. दिवाळीसाठी लागणारे रंग आणि पूजेचे साहित्यही वाढीव दराने विकले जात आहे. मात्र, सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्राहकांकडून खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.
कपडे, घरगुती उपयोगाच्या वस्तू आणि वाहनांच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीनिमित्त विविध दुकाने, मॉल्स आणि वाहनांच्या शोरूममध्ये सवलतींच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून विविध ऑफर्स दिल्या जात असल्याने खरेदीदारांची गर्दी वाढली आहे.

पारंपरिक दिवाळी साजरी करणाऱ्या नागरिकांकडून मातीच्या पणत्यांना विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी पणत्या विक्रीसाठी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. दिवाळीच्या पारंपरिक साहित्याच्या खरेदीमुळे या विक्रेत्यांनाही चांगला नफा मिळत आहे.
दरम्यान, यंदा विविध आकारांचे आणि आकर्षक रंगसंगतीतील आकाशकंदील बाजारपेठेचे खास आकर्षण ठरत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुकानांसमोर आकाशकंदिलांच्या रंगीबेरंगी रांगा लावण्यात आल्या आहेत. पारंपरिक कंदिलांसोबतच आधुनिक डिझाइनमधील विविध प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे आकाशकंदील खरेदीसाठीही नागरिकांची गर्दी होत आहे.
एकंदरीत पणत्या, आकाशकंदील, कपडे आणि सजावटीच्या साहित्याने बेळगावची बाजारपेठ नटली असून, दिवाळीच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे.







