बेळगाव : गोव्यातील पणजी येथे आयोजित ‘फिट फॉर लाईफ’ आंतरराज्यीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश मिळविले. विविध गटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत खेळाडूंनी २० सुवर्ण, १५ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण ४८ पदके पटकावली. यातील चार जलतरणपटूंनी आपापल्या वयोगटात वैयक्तिक अजिंक्यपद मिळवून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
स्पर्धेत कुमार तनुज सिंग याने गट क्रमांक १ मध्ये पाच सुवर्णपदकांची कमाई करत वैयक्तिक विजेतेपद मिळविले. त्याने ‘सर्वात वेगवान जलतरणपटू’ हा विशेष पुरस्कारही पटकावला. या कामगिरीबद्दल त्याला ६ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
कुमार दक्ष जाधव याने गट क्रमांक ३ मध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवत वैयक्तिक अजिंक्यपदावर नाव कोरले. कुमार अद्वैत जोशी याने गट क्रमांक ४ मध्ये पाच सुवर्णपदके जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. तर कुमारी वर्धा उप्पार हिने गट क्रमांक ५ मध्ये दोन सुवर्णपदकांसह वैयक्तिक विजेतेपद मिळविले.
या यशस्वी संघातील आदी शिरसाठ, अर्णव किल्लेकर, वर्धन नाकाडी, विराट उप्पार, धैर्य शिंदे, शिवा पोटे, अस्मा काकडे, तनिषा खन्नूकर, आराध्या तिवारी, जिजा कारलेकर आणि पुनर्वी मोदगेकर यांनीही विविध प्रकारांत पदके मिळवून संघाच्या एकूण कामगिरीत मोलाची भर घातली.
या सर्व जलतरणपटूंना आबा हिंद क्लबचे प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, किशोर पाटील, प्रसाद दरवंदर, विजय नाईक, कलाप्पा पाटील आणि मारुती घाडी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, शितल हुलभते, शुभांगी मुंगळूरकर आणि राजू मुंदडा यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
बेळगावच्या जलतरणपटूंनी आंतरराज्यीय स्तरावर मिळविलेल्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.








