• गुरुवारी सायंकाळी ४ ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मद्यविक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर निर्बंध

बेळगाव : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता राखण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल शिंदे यांनी दारू विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा, १९६५ मधील कलम २१(१) अंतर्गत ही तातडीची कारवाई करण्यात आली आहे.

गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत, अशा १४ तासांच्या कालावधीसाठी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात दारूबंदी लागू राहणार आहे.

या कालावधीत जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप, बार अँड रेस्टॉरंट, पब आणि क्लब बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारच्या मद्याची विक्री, वाहतूक किंवा साठवणूक करण्यास परवानगी नसेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेशाचे उल्लंघन करून गुप्तपणे मद्यविक्री केल्यास संबंधितांवर उत्पादन शुल्क कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच संबंधितांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी राहुल शिंदे यांनी दिला आहे.