• भाच्यासह सात जणांना अटक
  • कट रचून नातेवाईकांकडील रक्कम लुटली
  • २.३९ कोटींची रोकड, दोन दुचाकी आणि कार जप्त

बेळगाव : पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून नातेवाईकांकडून २ कोटी ६८ लाख रुपये गोळा केल्यानंतर त्याच रकमेवर दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कटाचा सूत्रधार असलेल्या भाच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ कोटी ३९ लाख रुपये रोकड, दोन दुचाकी आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

मूडलगी तालुक्यातील संगणकेरी येथील चिदानंद सिद्धारूढ कुरबेट याने एक लाख रुपये दिल्यास एक लाख ३० हजार रुपये परत देण्याचे आमिष दाखवले होते. त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्याचा मामा चन्नबसप्पा आणि तक्रारदारांनी मिळून २ कोटी ६८ लाख रुपये गोळा केले. मात्र, ही रक्कम लुटण्याचा कट चिदानंदनेच आखल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

३० ऑक्टोबर रोजी बीरप्पा वनसन्नी यांच्या शेडमध्ये ही रक्कम आणण्यात आली होती. रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास पैसे मोजण्याचे काम सुरू असताना संजू अरभावी, राजाराम माळ्यागोळ, रमेश माळ्यागोळ, विठ्ठल माळ्यागोळ, प्रकाश मेळवणकी, राघवेंद्र कोप्पद, रामाप्पा तळवार आणि मारुती अरभावी यांनी शेडमध्ये प्रवेश केला. त्यांनी चन्नबसप्पा यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांना दोरीने मारहाण केली आणि पाच बॅगांमधील २.६८ कोटी रुपये घेऊन पलायन केले.

याप्रकरणी मूडलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसर्गी आणि गोकाकचे डीवायएसपी रवी डी. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक शैलेश बैकोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करून चिदानंदसह सात जणांना अटक केली. आरोपींकडून २ कोटी ३९ लाख रुपये रोकड, दोन दुचाकी आणि एक कार जप्त करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणात रजेवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची भूमिकाही समोर आली असून, पोलीसप्रमुखांनी त्याची चौकशी केली आहे. या घटनेशी कोणत्याही आमदाराचा संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.