• बेळगाव, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी

मुंबई : बेळगाव, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी १ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील करी रोड नाका येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात आला. यावेळी फलक दाखवून कर्नाटक सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

बेळगाव, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट झालाच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी दिलीप मिस्त्री यांनी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची विनंती केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर निर्णय घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात समाविष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

पिराजी पाटील यांनीही सीमाप्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यक्त केली.

या आंदोलनात दिग्विजय गुंडू पाटील, जोतिबा इंचनालकर, प्रशांत बिर्जे, मधुकर पाटील, दिलीप मिस्त्री, पिराजी पाटील, गजानन साळुंखे, अशोक सावंत, जयवंत पाटील, शिवाजी कुराडे, चंद्रकांत कालकुंद्रे, अमित पाटील, रानाबा देशवळ, मोहन कळविकट्टे, शिवसेना शाखाप्रमुख गोपाळ खाडे, गजानन मनगुतकर आणि संभाजी मनगुतकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सीमाभागाचा प्रश्न सुटेपर्यंत मराठी भाषिकांच्या मागणीचा आवाज लोकशाही मार्गाने बुलंद ठेवण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.