• जीर्ण इमारत पाडण्याचे काम सुरू
  • त्याच जागी आधुनिक सुविधांनी युक्त नवीन कार्यालय उभारणार

बेळगाव : बेळगावातील ब्रिटिशकालीन उपनोंदणी कार्यालयाच्या ऐतिहासिक इमारतीला अखेर निरोप देण्यात येत असून, ही जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. अनेक दशकांपासून नागरिकांना सेवा देणारी ही इमारत जीर्ण झाल्याने प्रशासनाने ती हटवून त्याच जागी आधुनिक सुविधांनी युक्त नवीन कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इमारत पाडण्याचे काम सुरू असल्याने उपनोंदणी कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस स्थलांतरित करण्यात आले आहे.

ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेली ही इमारत अनेक वर्षांपासून मालमत्ता नोंदणीसह विविध शासकीय कामांसाठी नागरिकांच्या सेवेत होती. मात्र, कालांतराने इमारतीची अवस्था जीर्ण झाल्याने तिच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशस्त कार्यालय उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. सध्याची इमारत पूर्णपणे पाडून जागा मोकळी करण्यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नवीन इमारतीचे काम होईपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उपनोंदणी कार्यालयाचे कामकाज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस सुरू ठेवण्यात आले आहे. मालमत्ता नोंदणीसह कार्यालयातील सर्व सेवा तेथून पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.