• दीड लाख नागरिकांच्या उपस्थितीची शक्यता
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवानिमित्त बेळगाव शहरात आजपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होत आहे. या कार्यक्रमांना लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बेळगाव शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित बैठकीत पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी बंदोबस्तावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. शहराचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या चन्नम्मा सर्कल येथे विशेष दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच स्थानिक अधिकारी आणि आयोजकांशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना केल्या.

मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रात्री १०.३० वाजता ध्वनिवर्धक आणि डीजे पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्लाझ्मा आणि लेझर लाईट्सच्या वापरावर घालण्यात आलेली बंदीही काटेकोरपणे पाळण्यास सांगण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला.

दरम्यान, पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चन्नम्मा सर्कल येथे रात्री १ वाजेपर्यंत स्थानिक आयोजक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी जिल्हा क्रीडांगणावर परेड पार पडेल. यानंतर भुवनेश्वरी देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांसाठी सुमारे एक ते दीड लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.