• व्यवस्था सुधारण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

बेळगाव : बेळगावच्या बीम्स रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि प्रशासकीय त्रुटींची दखल घेत राज्याचे उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता आणि रुग्णांची गर्दी पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी व्यवस्था तातडीने सुधारण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी रुग्णालयातील विविध वॉर्ड आणि औषध वितरण केंद्रांना भेट देत रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णांच्या अडचणी आणि तक्रारी जाणून घेतल्या. बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) काउंटरसमोर मोठी गर्दी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काउंटरची संख्या वाढविण्याचे आणि भारतीय सैनिकांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पाहणीदरम्यान रुग्णांची योग्य प्रकारे ड्रेसिंग केली जात नसल्याचे आढळल्याने त्यांनी संबंधित डॉक्टरांना जाब विचारला. रुग्णालयात मोफत उपलब्ध असलेली औषधे न देता रुग्णांना बाहेरील औषध दुकानांतून औषधे खरेदी करण्यास सांगितले जात असल्याच्या प्रकारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णांना आवश्यक औषधे रुग्णालयातच उपलब्ध करून द्यावीत आणि गरीब रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी स्पष्ट सूचना त्यांनी बीम्स प्रशासनाला केली.

शेजारील राज्यांतून उपचारासाठी आलेल्या अन्य भाषिक रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशीही उपलोकायुक्तांनी संवाद साधला. या प्रदेशातील पाणी पिताना आणि अन्न खाताना कन्नड भाषाही शिकावी, असे आवाहन त्यांनी त्यांच्याशी बोलताना केले. त्याचबरोबर रुग्णालयातील अधिकारी आणि डॉक्टरांनी रुग्णांशी संवेदनशीलतेने वागावे, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि योग्य वैद्यकीय सेवा द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.