- बचाव पथक आणि एसडीआरएफच्या शोधमोहिमेला यश
- २१ वर्षीय आशिष राजगोळकरचा मृतदेह आढळला
बेळगाव : शिरूर धरणात बुडालेल्या बेळगावच्या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. रविवारी सायंकाळी धरणात पडलेल्या आशिष अशोक राजगोळकर या तरुणाचा सोमवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता मृतदेह आढळला. या घटनेमुळे बेळगावमधील शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आशिष राजगोळकर हा बेळगावमधील शिवाजीनगर येथील पाचव्या क्रॉस परिसरात राहत होता. तो वेगा हेल्मेट कंपनीत कामाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी शिरूर धरण परिसरात असताना पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि पद्मप्रसाद हूली यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
तरुणाचा शोध घेण्यासाठी सोशल वर्कर रेस्क्यू टीम, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि यमकनमर्डी पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम हाती घेतली. धरणाच्या पाण्यात शोध घेण्यासाठी संबंधित पथकांनी अथक प्रयत्न केले. अखेर आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आशिषचा मृतदेह शोधण्यात यश आले.
या शोधमोहिमेदरम्यान बचाव पथकातील सदस्य, एसडीआरएफचे जवान आणि पोलिसांनी समन्वयाने काम केले. त्यांच्या तत्परतेचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. मात्र, अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.







