- हजारो स्वयंसेवकांचा सहभाग ; ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने स्वागत
बेळगाव : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. पारंपरिक वेशभूषेतील हजारो स्वयंसेवक सरदार हायस्कूलच्या मैदानावर एकत्र आले. तेथून सुरू झालेल्या पथसंचलनाने शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले.
सरदार हायस्कूलच्या मैदानावरून सुरू झालेले संचलन कॉलेज रोड, राणी चन्नम्मा सर्कल, शनिवार खूट आणि काकतीवेस मार्गे पुढे गेले. स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पावलांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. संचलनाच्या मार्गावर नागरिकांनी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली.
पथसंचलनाच्या अग्रभागी असलेल्या जीपमध्ये संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि माधव सदाशिव गोळवलकर यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. एकतेच्या घोषणांच्या तालावर स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले होते. यावेळी विविध महान नेत्यांच्या वेशभूषेत सजलेल्या लहान मुलांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यानंतर संचलन गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, शनीमंदिर, कुलकर्णी गल्ली, टिळक चौक, रामलिंगखिंड गल्ली आणि धर्मवीर संभाजी सर्कल मार्गे पुढे जात लिंगराज कॉलेजच्या मैदानावर पोहोचले. संचलनादरम्यान आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला.
पथसंचलन शांततेत पार पडावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बेळगाव पोलीस विभागाकडून विविध मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.








