- महापालिकेच्या ३० सफाई कर्मचाऱ्यांसह १० कचरा वेचकांचा सन्मान
- सामाजिक योगदानाची दखल
बेळगाव : शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सातत्याने परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ३० महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच शहरातील स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या १० कचरा वेचकांचाही गौरव करण्यात आला.
शहरातील कचरा संकलन आणि परिसर स्वच्छ ठेवण्यात सफाई कर्मचारी व कचरा वेचकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या घटकांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांच्या कामाचा सन्मान करून त्यांना समाजात योग्य आदर आणि मान्यता मिळावी, हा या कार्यक्रमामागील उद्देश होता.
रोटरीच्या जनसंपर्क उपक्रमांतर्गत यावेळी रोटरीचा लोगो असलेल्या पिशव्यांचेही वितरण करण्यात आले. या माध्यमातून संस्थेच्या सेवाभावी कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
समाजाच्या स्वच्छतेसाठी निःस्वार्थपणे मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्याला सन्मान मिळणे आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला रोटेरियन रक्षा उपाध्ये, रोटेरियन शीला पाटील, रोटेरियन सविता हेब्बार आणि डॉ. स्मिता गुडगणट्टी उपस्थित होत्या. रोटेरियन सुजाता वस्त्रद यांनी उपक्रमाचे संयोजन केले. क्लबच्या अध्यक्ष रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.








