• गल्लीगल्लीत बैठका घेऊन जनजागृती करणार
  • आढावा बैठकीत आंदोलनाच्या पूर्वतयारीवर चर्चा

बेळगाव : आगामी १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती आणि आंदोलनाच्या नियोजनासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची आढावा बैठक नुकतीच झाली. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मराठी भाषिकांचे प्रश्न, प्रशासनाची भूमिका आणि आंदोलनाच्या पूर्वतयारीवर चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अलीकडील वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. प्रशासनाकडून परवानगी मिळाली किंवा नाही, तरी समितीने निश्चित केलेल्या ठिकाणी मराठी भाषिक आणि कार्यकर्त्यांनी सकाळी लवकर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला मराठी जनतेच्या भावना आणि ताकदीची जाणीव करून देण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

  • गल्लीगल्लीत बैठका घेऊन जनजागृतीवर भर :

काळ्या दिनाच्या आंदोलनाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरातील विविध भागांत लहान बैठका आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. चार ते पाच गल्ल्यांच्या परिसरात बैठका घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार समितीचे वरिष्ठ पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आंदोलनात व्यापक सहभाग मिळवण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

  • सात दशकांच्या लढ्याचा उल्लेख ; एकजुटीचे आवाहन :

समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी मराठी भाषिकांच्या आंदोलनातील सातत्यावर भर दिला. गेल्या ७० वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्यात मराठी जनतेची भूमिका ठाम राहिली असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध आंदोलनांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी मराठी अस्मितेच्या प्रश्नावर जनतेची एकजूट कायम असल्याचे सांगितले. प्रतिकूल परिस्थितीतही मराठी जनता आपल्या मागण्यांवर ठाम राहिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रणजीत चव्हाण-पाटील यांनीही आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. हा लढा संपल्याचे मानणाऱ्यांचा समज चुकीचा असल्याचे सांगत, कोणताही अतिआत्मविश्वास न बाळगता संयमाने आणि ठामपणे पुढील वाटचाल केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. गेल्या अनेक दशकांत अपेक्षित असलेली एकजूट आता अधिक बळकट होत असल्याचे सांगून सर्वांच्या सहकार्याने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यासंदर्भातील न्यायालयीन लढ्याचाही सर्वोच्च न्यायालयात सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला ॲड. अमर यळ्ळूरकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मांडोळकर, नेताजी जाधव यांच्यासह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.