• चव्हाट गल्लीच्या मानाच्या श्री देवदादा सासनकाठीचे विशेष महत्त्व
  • घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत विविध धार्मिक विधी
  • पिढ्यान्‌पिढ्या जपली जाते ऐतिहासिक परंपरा

बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक दसरा उत्सवाला सुमारे २०० वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. या उत्सवात चव्हाट गल्लीतील श्री देवदादा सासनकाठीला विशेष मानाचे स्थान आहे. श्री देवदादांच्या देवघरात पिढ्यान्‌पिढ्या जपली जाणारी ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे नेली जात आहे. नवरात्रातील विविध धार्मिक विधींपासून विजयादशमीच्या मिरवणुकीपर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रथा या उत्सवाचे आकर्षण ठरतात.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून शेतातील मातीमध्ये पाच प्रकारची धान्ये पेरली जातात. दररोज त्यावर तीर्थ शिंपडून फुलांची माळ अर्पण केली जाते. दुसऱ्या दिवसापासून सकाळी आणि संध्याकाळी श्री ईश्वरी कुबेर यांच्या उपस्थितीत पूजा केली जाते. यावेळी श्री केदारलिंगाचा नंदी देवघरासमोर उभा करून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात चव्हाट गल्लीची ग्रामदेवता श्री चव्हाटा यांची पूजा करण्यात येते.

यानंतर चव्हाट गल्लीतील श्री मारुती मंदिराभोवती दिवटीच्या प्रकाशात पालखीचे पाच फेरे काढले जातात. गल्लीतील लहान मुली सजवलेल्या आरत्या घेऊन या धार्मिक सोहळ्यात सहभागी होतात. पालखीचे पाच फेरे पूर्ण झाल्यानंतर आरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. नवरात्रातील नऊ दिवस हा धार्मिक विधी भक्तिभावाने पार पडतो.

अष्टमीच्या रात्री श्री ज्योतिर्लिंगाच्या मूर्तीवर विशेष अभिषेक केला जातो. या अभिषेकासाठी ३६५ पिकांची पाने, द्रोणामध्ये धवसा, शमीची पाने, पाच नद्यांचे पाणी, सुका मेवा आणि विविध फळांचा वापर केला जातो. या पूजेमागे शेतकऱ्यांच्या समृद्धीची आणि त्यांच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, अशी प्रार्थना असल्याचे सांगितले जाते. चव्हाट गल्ली ही शेतकरी परंपरेशी जोडलेली असल्याने पिकांचे चांगले उत्पादन व्हावे आणि सर्व कार्यांत यश मिळावे, या भावनेतून हा विधी केला जातो. या वेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून पूजेत सहभागी होतात.

नवमीच्या दिवशी देवाच्या तवाजमा आणि शस्त्रांची पूजा केली जाते. या परंपरेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बेळगावातील विविध भक्तांच्या घरातून देवघरात नैवेद्य आणला जातो. त्यामुळे या धार्मिक सोहळ्यात अनेक कुटुंबांचा सहभाग असतो आणि श्रद्धेची परंपरा सामूहिकरीत्या जपली जाते.

विजयादशमीच्या दिवशी श्री देवदादा सासनकाठीचा भव्य सोहळा पार पडतो. नंदीला पुढे घेऊन सासनकाठीसह भक्त उत्साहाने मिरवणुकीत सहभागी होतात. श्री मारुती मंदिराजवळ नंदी आल्यानंतर नंदी, सासनकाठी आणि पालखी यांचा पारंपरिक विधी पार पाडला जातो. त्यानंतर बेळगावातील प्रमुख देवांच्या सासनकाठ्या आणि पालख्यांसह मिरवणूक मारुती गल्लीतील मंदिराकडे मार्गस्थ होते.

या उत्सवाची सांगता ज्योती कॉलेजच्या मैदानावरील सोने लुटण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने होते. यावेळी नंदी धावत जाऊन बेंडी फोडण्याची प्रथाही पार पाडली जाते. अशा विविध धार्मिक विधी, शेतकरी संस्कृतीशी असलेले नाते आणि सामूहिक भक्तिभाव यामुळे चव्हाट गल्लीची श्री देवदादा सासनकाठी बेळगावच्या दसरा उत्सवातील मानाचे आणि ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान टिकवून आहे.