- विविध प्रकल्पांसाठी जमीन वापरण्यास विरोध
- भूसंपादन न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मण्णूर गावातील शासकीय गायरान जमिनी विविध प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या जमिनींचे संरक्षण करावे आणि प्रस्तावित प्रकल्पांसाठी सुरू असलेले सर्वेक्षण तातडीने थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. देवस्की पंच कमिटी आणि गावातील प्रमुख व्यक्तींच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
मण्णूर गावातील ७५ टक्क्यांहून अधिक नागरिक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. गावात आधीच शेतीयोग्य जमिनीची कमतरता असल्याने उपलब्ध गायरान जमीन विविध प्रकल्पांसाठी वापरणे ग्रामस्थांच्या उपजीविकेवर परिणाम करणारे ठरेल, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. सर्व्हे क्रमांक १०१ मधील क्रीडांगणाची जागा आश्रय योजनेसाठी वापरण्याचा तसेच सर्व्हे क्रमांक १४७ मध्ये कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सुरू असलेले सर्वेक्षण तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, सर्व्हे क्रमांक ५ मधील जागेवर दरवर्षी धार्मिक रेणुका यात्रा आणि दसरा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे या जागेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन ती जागा आहे तशीच राखून ठेवावी, अशी विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे.
गायरान जमीन जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त असून गावाचा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीनेही तिचे महत्त्व आहे. त्यामुळे या जमिनींचे भूसंपादन थांबवून ग्रामस्थांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन करण्यात आले. मागण्यांकडे दुर्लक्ष करून भूसंपादनाची प्रक्रिया पुढे सुरू ठेवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आर. एम. चौगुले यांनी दिला.
यावेळी विनय कदम, अरुण, मारुती चौगुले, यल्लाप्पा करटकर, संदीप डोणकरी, रवी चौगुले यांच्यासह मण्णूर गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.








