• ४० हून अधिक ठिकाणी तपासणी
  • पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम
  • नियमभंग करणाऱ्या क्लबमधील व्यवहार तातडीने बंद

बेळगाव : शहरातील क्लब, पब आणि हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची तपासणी करण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी व्यापक मोहीम राबवली. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ४० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून तपासणी करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी निर्धारित नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. काही क्लबमध्ये अल्पवयीन मुले आढळली, तर काही ठिकाणी नियमांचे पालन न करता मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकांचा वापर केला जात असल्याचे समोर आले.

नियमभंग आढळलेल्या काही क्लब आणि पबमधील सुरू असलेले उपक्रम पोलिसांनी तातडीने बंद केले. संबंधित ठिकाणांच्या व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातील मनोरंजनाच्या ठिकाणी नियमांचे पालन होते की नाही, याची पडताळणी या मोहिमेतून करण्यात आली.

दरम्यान, राजकीय क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या काही प्रतिष्ठित क्लबमध्येही पोलिसांनी तपासणी केल्याने या कारवाईची शहरात चर्चा सुरू झाली आहे.

क्लब, पब आणि हॉटेल्समध्ये कायद्याने निश्चित केलेल्या नियमांची अंमलबजावणी व्हावी, अल्पवयीन व्यक्तींच्या प्रवेशावर नियंत्रण राहावे आणि ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबतच्या नियमांचे पालन व्हावे, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आल्याचे समजते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात यापुढेही कारवाई होण्याची शक्यता आहे.