• आमदार आसिफ सेठ यांच्या निर्देशानुसार एक वर्षासाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती
  • २२ लाखांचा अंदाजित खर्च

बेळगाव : शहरातील वाढत्या अनधिकृत वस्त्या आणि बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी बेळगाव शहरी विकास प्राधिकरणाने (बुडा) विशेष दक्षता पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. बुडा अध्यक्ष आणि आमदार आसिफ सेठ यांच्या निर्देशानुसार हे पथक एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात येणार आहे.

शहरात अनधिकृत वस्त्या आणि बेकायदेशीर बांधकामांवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची कमतरता दूर करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. विशेष पथकाच्या माध्यमातून अशा बांधकामांवर देखरेख ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे.

  • ई-निविदा प्रक्रिया सुरू

विशेष दक्षता पथकाच्या नियुक्तीसाठी बुडा प्रशासनाने ई-निविदा मागवली आहे. या कामासाठी अंदाजित खर्च २२ लाख रुपये असून, निविदेचे मूल्य १८.६ लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे.

आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनधिकृत बांधकामांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि नियोजनबद्ध शहरी विकासाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष पथकाच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर नियमित देखरेख ठेवणे आणि संबंधित प्रकरणांत कठोर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे.