बेळगाव : समस्त अ‍ॅपमुळे वाढलेला कामाचा अतिरिक्त ताण, डेटा भत्त्यात करण्यात आलेली कपात आणि मानधन वितरणातील समस्यांविरोधात बेळगावात आशा कार्यकर्त्यांनी बुधवारी भव्य निषेध मोर्चा काढला. राणी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात जिल्ह्यातील हजारो आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या.

मानधनात कायमस्वरूपी वाढ करावी, ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून दिला जाणारा अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा आणि आरसीएम पोर्टलवरील मानधनाशी संबंधित समस्या तातडीने दूर कराव्यात, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

पूर्वी आशा कार्यकर्त्यांना देण्यात येणारा २५० रुपयांचा डेटा भत्ता बंद करण्यात आला असून, त्याचा भार आता कार्यकर्त्यांवरच टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला. ऑनलाइन सर्वेक्षण तसेच लसीकरणाची नोंदणी यांसारखी कामे पूर्ण करूनही मानधन वेळेवर मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे जिल्हा सचिव गीता रायगोळ यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात आशा कार्यकर्त्यांना १० हजार रुपये मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यातच समस्त अ‍ॅपच्या माध्यमातून केलेल्या कामाचे मानधन वेळेवर मिळत नसून वितरण प्रक्रियेतही गोंधळ असल्याची तक्रार करण्यात आली.

अथणी तालुक्यातील मदभावी येथील सुरेखा विजय कांबळे यांनी सांगितले की, या विविध समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून सुमारे एक ते दोन हजार आशा कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

  • १५ हजार रुपये निश्चित मानधनाची मागणी

राज्यभरातील आशा कार्यकर्त्यांच्या विविध मागण्यांसाठी ५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान आंदोलन सप्ताह पाळला जात आहे. आशा कार्यकर्त्यांना दरमहा १५ हजार रुपये निश्चित मानधन द्यावे, योग्य मोबाईल किंवा डेटा सुविधा उपलब्ध न करून देता समस्त अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन काम करण्याचा दबाव थांबवावा आणि गेल्या तीन-चार महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तातडीने जमा करावे, अशी मागणी आशा संघटनेचे प्रमुख के. सोमशेखर यादगिरी यांनी केली.

मोर्चादरम्यान आशा कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्या सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.