• मॅटवर रंगणार थरारक सामने ; ४०० हून अधिक मल्लांचा सहभाग अपेक्षित

बेळगाव : शहरातील टिळकवाडी येथील सामर्थ्य व्यायाम मंदिरात २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन’तर्फे होणाऱ्या या मॅट कुस्ती स्पर्धेत कर्नाटकातील ४०० हून अधिक कुस्तीपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

स्पर्धेच्या पत्रकाचे अनावरण बेळगावचे डीसीपी नारायण बरमणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने मल्ल स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सांगितले. मुला-मुलींसाठी विविध वयोगटांसह वरिष्ठ ओपन गटात ही स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांची मध्यप्रदेशातील उज्जैन येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. हे कुस्तीपटू राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करतील.

कुस्तीपटू अतुल शिरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडर-९, अंडर-१४, अंडर-१७, अंडर-१९ आणि वरिष्ठ ओपन गटात विविध वजनी गटांमध्ये मॅटवरील कुस्तीचे सामने रंगणार आहेत.

या स्पर्धेसाठी ७ ते २२ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. ग्रामीण भागातील लोकप्रिय खेळ असलेल्या कुस्तीला प्रोत्साहन मिळावे आणि युवा मल्लांना व्यासपीठ मिळावे, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.