बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावकरांच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा मान राखत मध्यवर्ती सार्वजनिक दसरा महोत्सव महामंडळाच्या माध्यमातून दसरा महोत्सव अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. महामंडळाचे मानद अध्यक्ष श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा महोत्सवाचे आयोजन सातत्याने उत्कृष्ट पद्धतीने केले जात आहे.
महामंडळाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देताना तसेच युवा वर्गाला संघटनेच्या कार्यात प्राधान्य देण्याच्या उद्देशाने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकमुखी निर्णयाने संदीप कामुले यांची मध्यवर्ती सार्वजनिक दसरा महोत्सव महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संदीप कामुले यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे महामंडळाच्या कार्याला अधिक बळ मिळेल आणि युवा वर्गाचा सहभाग वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या निवडीप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. आनंद आपटेकर, मार्गदर्शक श्री. मालोजीराव अष्टेकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री. दत्ता जाधव, जनसंपर्क प्रमुख श्री. विकास कलघटगी, सेक्रेटरी श्री. विजय तमुचे, तसेच महामंडळाचे पदाधिकारी श्री. लक्ष्मण किल्लेकर, श्री. प्रमोद बिरजे, श्रीनाथ पवार, श्री. ज्योतिबा आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप कामुले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारसा जपत आगामी काळात विविध उपक्रम अधिक व्यापक पद्धतीने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
युवा नेतृत्वाला संधी देत महामंडळाच्या कार्याचा विस्तार करण्याच्या दिशेने संदीप कामुले यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड ही महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.








