- कवी जितेंद्र रेडेकर यांच्या भावस्पर्शी कवितांना दाद
- शब्द गंध कवी मंडळ संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : शब्दगंध कविमंडळ संघ, बेळगावतर्फे आयोजित आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने ‘कवी समजून घेतांना’ या उपक्रमांतर्गत (पुष्प १० वे) “भावनांचे भोळे पक्षी” हा कवी जितेंद्र रेडेकर यांच्या काव्यवाचनाचा विशेष कार्यक्रम शनिवारी (दि. २६) सायंकाळी संपन्न झाला. शहीद भगतसिंग सभागृहात आयोजित या काव्यमैफिलीत विविध विषयांवरील आशयपूर्ण कविता, उत्तम सादरीकरण आणि विनोदी झालरीने रसिकांवर भुरळ घातली.
सुरुवातीला शब्दगंधचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करून संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. संस्थेचे सचिव सुधाकर गावडे व बसवंत शहापूरकर यांच्या हस्ते कवी जितेंद्र रेडेकर यांचा स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सुमारे पाऊण तास रंगलेल्या या काव्यसफरीत कवी जितेंद्र रेडेकर यांनी आई, बाप, निसर्ग, दुष्काळ, बालपण आणि प्रेम अशा विविध पैलूंवर आधारित कवितांचे सादरीकरण केले. ‘तन मराठी मन मराठी’ या कवितेतून त्यांनी मराठी अभिमान जागवला, तर ‘आई माझी म्हणते मला’ आणि ‘मागणं एकच आहे देवा, पुन्हा दे रे बालपण’ या कवितांमधून मातृप्रेम व बालपणाच्या आठवणींनी रसिकांच्या डोळ्यांच्या कडा सुखावल्या. शेतकर्यांची व्यथा मांडणारी ‘पडली ओसाड शेती, मातीची झाली राख’ ही कविता आणि ‘भावनांचे ही भोळे पक्षी’ या शीर्षकाची कविता उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.
त्याचप्रमाणे ‘रामदेव जवळची पाव भाजी पुन्हा एकदा खायची आहे’ या स्थानिक संदर्भाने सजलेल्या खुसखुशीत कवितेने व ‘माझ्या एका फोटोमध्ये माझे डोळे लाल का झाले?’ आणि ‘मी पोरगा लई भारी हाय’ या कवितांनी सभागृहात हास्याची कारंजी उडवली.
- स्थानिक कवींचे काव्यसंमेलन :
मुख्य कार्यक्रमापूर्वी आयोजित कवी संमेलनात उपस्थित कवींनी विविध विषयांवर बहारदार काव्यवाचन केले. यामध्ये रेखा गद्रे, स्नेहल बर्डे, अशोक सुतार, अंकिता कदम, अस्मिता आळतेकर, किरण पाटील, भरत गावडे, शिवाजी शिंदे, परशराम खेमणे, सुधाकर गावडे, बसवंत शहापूरकर, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, कृष्णा पारवाडकर व मधु पाटील आदींनी सहभाग नोंदवून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर गायकवाड यांनी केले, तर सुधाकर गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी शहरातील काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








