- २५ सप्टेंबरला दुपारी २ पासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक बदल लागू
- अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी
- नागरिकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
बेळगाव : अनंत चतुर्दशीनिमित्त शहरात निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बेळगाव वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गांत मोठे बदल केले आहेत. २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.
विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग चन्नम्मा सर्कल, कॉलेज रस्ता, पिंपळ कट्टा, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, एन. डी. सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल आणि कपिलेश्वर रोडमार्गे कपिलेश्वर तलाव असा निश्चित करण्यात आला आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध मार्गांवरील वाहने पर्यायी रस्त्यांवर वळविण्यात आली आहेत. खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी संगोळी रायन्ना चौक, एसपी ऑफिस रोड, कृष्णदेवराय चौक, सदाशिवनगर, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, विश्वेश्वरय्या नगर, बाजी प्रभू मार्ग, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शर्कत पार्क, सिंझो बंगला, सेंट पॉल्स हायस्कूल आणि मिलिटरी महादेव मंदिर क्रॉसमार्गे खानापूर रस्त्याला जोडणारा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
गोगटे सर्कल रेल्वे ओव्हरब्रिजमार्गे शहरात येणाऱ्या वाहनांनी गोगटे सर्कलवरून डावीकडे वळून काँग्रेस रोड, मिलिटरी महादेव मंदिर, सेंट पॉल्स हायस्कूल, सिंझो बंगला, शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शौर्य चौक, हिंडलगा गणेश मंदिर आणि हनुमाननगर डबल रोडमार्गे बॉक्साईट रोडचा वापर करावा.
गोगटे सर्कलवरून रेल्वे स्टेशन, हेड पोस्ट ऑफिस आणि जुन्या पीबी रोडकडे जाणारी वाहने गोवावेस, नाथाजीनगर सर्कल, खासबाग बसवेश्वर सर्कल आणि संभाजी गल्लीमार्गे वळविण्यात आली आहेत. नाथ पै सर्कलहून बँक ऑफ इंडिया आणि एसपीएम रोडकडे जाणाऱ्या वाहनांनी खासबाग बसवेश्वर सर्कल व संभाजी गल्लीमार्गे जावे.
जीजामाता सर्कलहून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक आणि पाटील गल्लीकडे जाणाऱ्या वाहनांनी मध्यवर्ती बसस्थानक किंवा व्हॉटसन शोरूममार्गे जुन्या पीबी रोडचा वापर करावा. जुन्या पीबी रोडवरून व्हीआरएल लॉजिस्टिक्स व भातकांडे स्कूलकडे जाणारी वाहने संभाजी गल्ली, बसवेश्वर चौक, खासबाग आणि नाथाजीनगरमार्गे वळविण्यात आली आहेत.
जुन्या पीबी रोडवरून यश रुग्णालय व कपिलेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांनी यश रुग्णालयाजवळ डावीकडे वळून व्हीआरएल लॉजिस्टिक्समार्गे जुन्या पीबी रोडला जोडावे. गुड्स शेड रोडवरून कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहनांनी एसपीएम रोड, मराठा मंदिर आणि गोवावेस सर्कलमार्गे प्रवास करावा. विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
- नो-पार्किंग व्यवस्था
२५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून काकतीवेस रोड, गणपती गल्ली, चन्नम्मा सर्कल ते मिरवणूक मार्ग, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल तसेच कपिलेश्वर मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर वाहन पार्किंगला बंदी राहणार आहे.
- नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था
देशपांडे वाडा ते गांधी सर्कलदरम्यानचा वेंगुर्ला रस्ता, डेअरी फार्मची जागा (सेंट झेव्हियर्स स्कूलजवळ), महिला पोलीस ठाण्यामागील मोकळी जागा, सरदार मैदान, न्यायालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, भरतेश शिक्षण संस्थेसमोरील कॅन्टोन्मेंट पार्किंगची जागा, संभाजी उद्यान तसेच जुन्या भाजी मार्केटजवळील मुजावर कोर्ट परिसरात नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिक आणि वाहनधारकांनी वाहतूक व्यवस्थेतील या बदलांची नोंद घेऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








