- बालगोपालांच्या वाचन-कथनाला मिळणार नवी दिशा
- ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान सहा दिवसांचे विनामूल्य शिबिर
बेळगाव : दसऱ्याच्या सुटीत बालगोपालांच्या श्रवण, वाचन आणि आकलन कौशल्यांना चालना देण्यासाठी लोकमान्य ग्रंथालयातर्फे ‘गोष्टींचा बडबडबाजा’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या अनुदानातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून पुण्याच्या तज्ज्ञ प्रदन्या वझे मार्गदर्शन करणार आहेत.
सोमवार (दि. ५ ऑक्टोबर) ते शनिवार (दि. १० ऑक्टोबर) या कालावधीत दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वरेरकर नाट्य संघाच्या आर्ट गॅलरीमध्ये हे शिबिर होणार आहे.
मराठी आणि इंग्रजी माध्यमातील ७ ते १३ वर्षे वयोगटातील, म्हणजेच इयत्ता दुसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांना या शिबिरात विनामूल्य सहभागी होता येणार आहे. प्रसंगकथन, कथा वाचन, कथा लेखन, कथाकथन, कविता समजून घेणे, कविता गायन आणि गोष्टी सांगणे अशा विविध उपक्रमांचा शिबिरात समावेश आहे. मजेदार कृती सत्रांच्या माध्यमातून मुलांच्या ऐकणे, वाचणे, आकलन आणि बोलणे या कौशल्यांना अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी ३ ऑक्टोबरपर्यंत लोकमान्य ग्रंथालयात नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी रंजनाताई यांच्याशी ८०५०४७९१४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.








