- खानापूर तालुक्यातील ६२ तर बेळगाव तालुक्यातील एक गाव प्रस्तावित झोनमध्ये
- ८६७ चौ. किमी क्षेत्राचा समावेश ; २५ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन
बेळगाव : पश्चिम घाटातील जैवविविधता आणि नैसर्गिक संपदेचे संरक्षण करण्यासाठी प्रस्तावित इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये बेळगाव जिल्ह्यातील ६३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार यामध्ये बेळगाव तालुक्यातील एका, तर खानापूर तालुक्यातील ६२ गावांचा समावेश असून, एकूण सुमारे ८६७ चौरस किलोमीटर क्षेत्र या झोनमध्ये येणार आहे.
प्रस्तावित इको-सेन्सिटिव्ह झोनमधील विकासकामांवर विविध अटी व निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. या अधिसूचनेवर नागरिक, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि संबंधित संस्थांना २५ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत.
हरकती लेखी स्वरूपात जिल्हा वनसंरक्षण अधिकारी, संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. प्राप्त हरकती शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
प्रस्तावित क्षेत्रापैकी बेळगाव तालुक्यात सुमारे १५ चौ. किमी, तर खानापूर तालुक्यात सुमारे ८५२ चौ. किमी क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रातील उद्योग, वाणिज्य, खाणकाम आणि अन्य विकासकामांसाठी विविध अटी व नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड श्रेणीनुसार कोणत्या उपक्रमांना परवानगी असेल, याची तरतूद अहवालात करण्यात आली आहे.
माधव गाडगीळ समितीच्या अहवालाच्या तुलनेत कस्तुरीरंगन अहवालातील नियम व अटी तुलनेने शिथिल असल्याचे जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले. संबंधित उद्योजकांकडूनही अहवालाचा अभ्यास सुरू असून, आवश्यक त्या अटी शिथिल करण्याबाबत हरकती व सूचना शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.








