- हुबळीतील कार्यक्रम टाळला, कोल्हापूर दौरा रद्द
- डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर दिल्लीकडे रवाना
हुबळी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी हुबळी येथे प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांनी नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हॉटेलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर हुबळीहून दिल्लीकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकसंबा आणि कोल्हापूर येथील नियोजित कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे.
अमित शहा शुक्रवारी रात्री हुबळी येथे दाखल झाले होते. शनिवारी केएलई संस्थेच्या नूतन वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक इमारतीसह १,२०० खाटांच्या रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांनी हॉटेलमध्येच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
- एकसंबा, कोल्हापूर दौऱ्यावरही परिणाम
अमित शहा यांच्या नियोजित दौऱ्यात हुबळीनंतर चिकोडी तालुक्यातील एकसंबा आणि त्यानंतर कोल्हापूरचा समावेश होता. एकसंबा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील दौरा रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, अमित शहा यांच्या प्रकृतीबाबतचा नेमका वैद्यकीय तपशील अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. उपलब्ध माहितीनुसार, प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता.








