• पोलिसांचा तगडा बंदोबस्त ; ३२ सेक्टरमध्ये शहराचे विभाजन
  • १,२६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून २४ तास नजर ; १९ प्रवेशमार्गांवर चेकपोस्ट

बेळगाव : गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यंदा शहरात तब्बल १,१५६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून, त्यापैकी २१ मूर्ती नव्याने प्रतिष्ठापित होणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी पत्रकार परिषदेत बंदोबस्ताची माहिती देत नागरिक आणि गणेश मंडळांना शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्याला ४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, आतापर्यंत सुमारे ७५ गणेशमूर्तींचे शहरात आगमन झाले आहे. गणेशोत्सवासाठी दोन टप्प्यांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील बंदोबस्त गणेश विसर्जनापर्यंत कायम राहणार आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधून तसेच विशेष पथकांमधून अतिरिक्त मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. सीएआर, केएसआरपी आणि आरएएफच्या जवानांचीही शहरात नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पथसंचलन करून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

शहरातील अतिसंवेदनशील भागांमध्ये तब्बल १,२६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांकडून २४ तास परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे.

बंदोबस्ताच्या नियोजनासाठी शहराचे ३२ सेक्टरमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक सेक्टरसाठी पीएसआय आणि एएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहा सीपीआय आणि दोन एसीपी यांच्या देखरेखीखाली ही व्यवस्था कार्यरत राहणार आहे. याशिवाय शहरात १२० फिक्स पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत.

प्रत्येक गणेश मंडपात तीन शिफ्टमध्ये किमान दोन पोलिस कर्मचारी २४ तास तैनात राहणार आहेत. शहरातील धार्मिक स्थळे आणि महत्त्वाच्या ठिकाणीही स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • शहराच्या प्रवेशद्वारांवर १९ चेकपोस्ट

शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गांवर १९ चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी संशयित व्यक्ती आणि वाहनांची २४ तास तपासणी केली जाणार आहे.

गणेशोत्सव काळात समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारे नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिला.