- गणेशोत्सवासाठी प्रवाशांची वाढती गर्दी
- नियमित गाड्यांना मोठी गर्दी ; आरक्षण मिळणेही कठीण
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नैऋत्य रेल्वेने बेंगळुरू – बेळगाव मार्गावर विशेष रेल्वेगाडी सुरू केली आहे. त्यामुळे बेंगळुरूहून बेळगावला येणाऱ्या तसेच बेळगावहून बेंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मुंबई-बेळगाव मार्गावरही गणेशोत्सवासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असताना अद्याप विशेष रेल्वे सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गावरही विशेष रेल्वेच्या काही फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणानिमित्त राहणारे बेळगाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गावी परततात. त्यामुळे सणाच्या काळात मुंबई-बेळगाव मार्गावरील प्रवासी संख्या वाढते. सध्या नियमित रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी होत असून आरक्षण मिळणेही कठीण झाले आहे. अनेक प्रवाशांना प्रतीक्षा यादीवर राहावे लागत आहे.
रेल्वेत आरक्षण न मिळाल्याने प्रवाशांना खासगी बस किंवा वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात खासगी बसचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
रेल्वे प्रवास सुरक्षित, सोयीस्कर आणि तुलनेने कमी खर्चाचा असल्याने मुंबई-बेळगाव मार्गावरही गणेशोत्सवाच्या काळात विशेष रेल्वेच्या काही फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.








