बेळगाव : गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या बोरगाव येथील २५ वर्षीय तरुणाचा बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. अनगोळ नाक्याजवळ ही दुर्घटना घडली. सुनील पाटील (वय २५, रा. बोरगाव, ता. निपाणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कामानिमित्त अनगोळ येथे वास्तव्यास होता. गणपती मूर्तीच्या सजावटीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याच्या उद्देशाने तो दुचाकीवरून बाहेर पडला होता. अनगोळ नाक्याजवळ आल्यानंतर त्याच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या बसशी जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की सुनीलचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कॅम्प रहदारी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे बोरगाव तसेच अनगोळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.