• शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील २२ केंद्रांवर आयोजन
  • मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

बेळगाव : शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पंचायतीतर्फे ३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये २२ ठिकाणी ऐच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या सामाजिक उपक्रमात शासकीय कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, संघटनांचे सदस्य आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले आहे.

जिल्हा पंचायतीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, विविध विभागांच्या सहकार्याने शिबिरासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. रक्तदानाची प्रक्रिया सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. रक्तदात्यांसाठी पिण्याचे पाणी, नाश्ता, भोजन, वैद्यकीय तपासणी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

  • शिक्षक दिनानिमित्त सामाजिक उपक्रम

विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याची संधी नागरिकांना मिळणार असल्याने सर्वांनी स्वेच्छेने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.