• न्यायालयात खासगी तक्रार दाखल

बेळगाव : महिला पीएसआयशी संबंधित अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे नाव सोशल मीडियावर चर्चेत आले असून, कारागृह प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. कारागृहाची बदनामी करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप करत सहाय्यक अधीक्षकांनी बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या संध्या नागराज यांच्यासह काही व्यक्तींविरुद्ध ही तक्रार करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाच्या वतीने सरकारी वकील महंतेश यांनी न्यायालयात तक्रार सादर केली आहे.

अलीकडे एका महिला पीएसआयने खासगी व्यक्तीला नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. हा व्हिडिओ ‘Sandhya777nagraj’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या व्हिडिओशी संबंधित पोस्टमध्ये महिला पीएसआयचा हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाशी संबंध असल्याचे भासविण्यात आल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला आहे. तसेच संबंधित पोस्टमध्ये गृहमंत्री प्रियांक खर्गे आणि कारागृह सुधारणा विभागाच्या एडीजीपींचे फोटो वापरण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, संबंधित महिला पीएसआयचा हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाशी कोणताही संबंध नसल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कारागृहाचे नाव अशा प्रकारे वापरून कथित अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याने कारागृहाची प्रतिष्ठा मलिन झाल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.

या प्रकरणाशी संबंधित आणखी एका कारवाईत हिंडलगा कारागृहात कैद असलेल्या तुमकूर येथील साईकुमारविरुद्ध यापूर्वी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कारागृहाबाबत खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 356(2) आणि 356(3) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. आता या तक्रारीवर न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.