बेळगाव : लक्ष्मीनगर, हिंडलगा येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा गणेशपूर स्कूल आयोजित राज्यस्तरीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत चार जिल्ह्यांतील ५० हून अधिक मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्योजक व समाजसेवक नागराज पाटील, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, विद्याभारती बेळगाव जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, संत मीरा स्कूलचे अध्यक्ष डॉ. विजय गोवेकर, मुख्याध्यापिका आरती पाटील, शाळा सुधारणा समितीचे सदस्य रामनाथ नाईक, महेश नरगुदकर, विद्याभारती जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, स्पर्धा सचिव श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, माधवी हरेर, मंजुनाथ भुजंगणावर आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती, ओंकार व भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मल्लखांबाचे पूजन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
मुख्याध्यापिका आरती पाटील यांनी प्रास्ताविकातून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत मल्लखांबासारख्या पारंपरिक भारतीय खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि शिस्त विकसित होत असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत बेळगाव, धारवाड, रामनगर आणि बेंगळुरू येथील शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक गटातील मुला-मुलींनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाला शकुंतला हुनगुद, पद्मजा थांबज, अभिषेक पटवर्धन, अश्विनी तुडवेकर तसेच पंच सूरज देसूरकर, स्वप्निल पाटील, अभय पिसाळे, श्री चौगुले, दर्शन के. के., संतोष पिसे, मोहन बी. एन., मारुती पी. एम. आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा जाधव यांनी केले, तर आरती पाटील यांनी आभार मानले.








