कित्तूर : येथील सराफी दुकानाचे शटर तोडून झालेल्या चोरीचा कित्तूर पोलिसांनी छडा लावला असून राजस्थानमधील चार आणि मध्य प्रदेशातील एका अशा पाच आंतरराज्यीय आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १७ लाख रुपये किमतीचे ७ किलो चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची आय २० कार जप्त करण्यात आली आहे.
१२ ऑगस्टच्या रात्री मानज्जा सराफी दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. दुकानातील चांदीचे दागिने लंपास करून आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास करत पाच आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले ७ किलो चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बसरगी आणि डीवायएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूर पोलिसांनी ही कारवाई केली.








