- न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार
बेळगाव : न्यायालयीन कामकाजादरम्यान वकिलांशी कथित गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी सर्व न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत निदर्शने करण्यात आली. विशेषतः क्रमांक २ जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या वर्तनाबाबत वकिलांनी नाराजी व्यक्त केली.
बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. जे. गंगाई यांनी संबंधित न्यायालयात वकिलांशी असहकार्याची भूमिका, उद्धट वर्तन तसेच दबाव आणण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप केला. यासंदर्भात यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थी पीएसआय अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी वकिलांना त्यांच्या जागेवरून उठवण्यात आल्याच्या घटनेचाही वकिलांनी निषेध केला. तसेच वकिलांच्या बसण्याची व्यवस्था, साक्षीदार आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत न्यायालयीन नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप करण्यात आला.
संबंधित नियमांची कागदपत्रे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याची योग्य दखल घेतली गेली नसल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून दूर राहत आंदोलन केले.
या प्रकरणाची माहिती मुख्य जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय न्यायाधीशांकडे मांडण्यात येणार असल्याचे बार असोसिएशनकडून सांगण्यात आले. संबंधित न्यायाधीशांची बदली करावी, अशी मागणीही वकिलांनी केली आहे.
दरम्यान, वकिलांच्या बहिष्कारामुळे बेळगावातील न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. या प्रकरणी प्रशासनाकडून पुढील कोणती भूमिका घेतली जाते, याकडे वकिलांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.








