बेळगाव : बेळगाव रेल्वे स्टेशनच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासोबतच दोन्ही बाजूंना गटार व्यवस्था उभारावी, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशन, डेक्कन हॉस्पिटल आणि बसवेश्वर रेल्वे ओव्हरपासच्या हद्दीत असलेला हा रस्ता एल अँटीच्या कामामुळे तसेच पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडेही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरवर्षी या रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यामुळे काही दिवसांतच रस्त्याची पुन्हा दुरवस्था होते. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिकांना होत आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने वाहतुकीची समस्याही निर्माण होत आहे.

आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खासदारांनी संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करावे तसेच दोन्ही बाजूंना नाल्यांचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.