- मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि महिला मंत्र्यांच्या समावेशाबाबत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बेळगावात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांच्या समावेशासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, उमाश्री आणि गायत्री यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. महिला मंत्र्याची निवड होईपर्यंत संबंधित खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडेच राहणार आहे. पक्ष हायकमांड ज्यांची निवड करेल, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री जमीर अहमद यांच्या मुद्द्यावर बोलताना भाजपला आमच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी ठणकावले. तसेच यरगट्टी, सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची उद्या पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव मंजूर करण्यास महापालिका टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या तीन महिन्यांपासून पालिका प्रशासनाकडून मुद्दाम बैठक घेतली जात नसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला बेळगाव उत्तरचे आमदार असिफ शेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आणि पोलीस अधीक्षक के. रामराजन उपस्थित होते.








