- ग्रामस्थांचे महामंडळ उपाध्यक्षांना निवेदन
बेळगाव : तालुक्यातील मच्छे गावातील अपुऱ्या बससेवेमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गावातून शहराकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असतानाही बस थांबा व फेऱ्यांची पुरेशी सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ही समस्या तातडीने सोडवावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वायव्य कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हणमन्नावर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मच्छे गावाची लोकसंख्या सुमारे १५ ते २० हजार असून, दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि नागरिक विविध कामांसाठी बेळगाव शहरात ये-जा करतात. मात्र या मार्गावरून धावणाऱ्या अनेक बसेस गावात थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बससेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना ऑटो आणि टेम्पोचा वापर करावा लागत असून, त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
अलिकडेच बस पकडण्याच्या प्रयत्नात एका विद्यार्थिनीचा पडून अपघात झाला आणि ती जखमी झाली. या घटनेनंतर गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सुनील हणमन्नावर यांची भेट घेऊन मच्छे गावासाठी अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात, तसेच धावणाऱ्या बसेसना गावात नियमित थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत सोमवारपर्यंत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन सुनील हणमन्नावर यांनी दिले. मात्र, निर्धारित वेळेत बससेवेचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.








