• मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन
  • बेळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात
  • पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते ध्वजारोहण

बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील वीरांचे बलिदान देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी बेळगाव जिल्हा स्टेडियमवर आयोजित जिल्हास्तरीय सोहळ्यात ते बोलत होते.

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीतासह तिरंग्याला सलामी देण्यात आली. परेड कमांडरने पालकमंत्र्यांना मानवंदना दिल्यानंतर त्यांनी खुल्या वाहनातून संचलनाची पाहणी केली. पोलीस विभाग, अग्निशमन दल, होमगार्ड, एनसीसी तसेच महापालिकेचे नागरी कर्मचारी आणि विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन सादर केले.

आपल्या भाषणात सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक योगदानाचा गौरव केला. कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायण्णा आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांसह जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. बेळगाव शहरातील एका प्रकल्पाचा पहिला टप्पा २७५.५३ कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २४० कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी ७५ कोटी रुपयांचा डीपीआर तपासणीच्या टप्प्यात असून, नवीन स्टेडियमसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील परिवहन व्यवस्था सुधारत असून ‘शक्ती’ योजनेअंतर्गत महिलांना मोफत प्रवासाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना आवश्यक खतांचे वितरण करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सोहळ्यादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आसिफ सेठ, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, प्रादेशिक आयुक्त एम. जानकी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, ग्रामपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.