- युवा समितीचा उपक्रम
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील हलकर्णी, शिवाजीनगर आणि चिरमूरकर गल्ली येथील मराठी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासोबतच मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
गेल्या नऊ वर्षांपासून सीमाभागातील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी युवा समितीच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी आणि त्यांच्या पालकांमध्येही मातृभाषेतील शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, हा उपक्रमामागील उद्देश असल्याचे युवा समितीचे कार्यकर्ते श्री. पाटील, तुषार देसाई आणि मुकेश गुरव यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेचे जतन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मराठी शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी तसेच शाळांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही उपस्थितांमध्ये चर्चा झाली.
साहित्य वितरणाच्या वेळी हलकर्णी, शिवाजीनगर आणि चिरमूरकर गल्ली येथील शाळांतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूरचे श्री पाटील, मुकेश गुरव, श्रीहरी पाटील, प्रज्योत पाटील, तुषार देसाई, साई माळीक, गजानन पाटील, श्रेयस हल्याळकर, चेतन हंगीरकर, सोमनाथ दोडमणी आणि रीतेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.








