बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याचे मंडळ पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस सेवेत प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे बेळगाव पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सन २००५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झालेल्या गड्डेकर यांनी विविध ठिकाणी कार्यरत असताना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासह गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेषतः सीसीबी आणि सीईएन विभागात कार्यरत असताना त्यांनी सायबर गुन्ह्यांचा तपास आणि आरोपींचा माग काढण्यात उल्लेखनीय कामगिरी केली.
इराणी टोळीचा पर्दाफाश करणे, सायबर फसवणुकीद्वारे नागरिकांकडून लुटण्यात आलेली लाखो रुपयांची रक्कम परत मिळवून देणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत फसव्या कॉल सेंटरवर छापे टाकणे अशा महत्त्वपूर्ण कारवायांमध्ये गड्डेकर यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या तपासकौशल्यामुळे अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
गड्डेकर यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित झाल्याने बेळगाव पोलीस दलातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा बहुमान इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.








