- गायरान जमिनीवर कचरा प्रकल्प नको ; ‘गो-स्मशान’ नोंद करावी
- ग्रामस्थांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : तालुक्यातील सावगाव आणि बेनकनहळ्ळी येथील सरकारी गोमाळ व गायरान जमिनींचे संरक्षण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थ, शेतकरी आणि माजी ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे निवेदन सादर केले. या जमिनी कोणत्याही खासगी संस्था अथवा नवीन प्रकल्पासाठी देऊ नयेत, तसेच बेनकनहळ्ळी येथील सर्वे क्रमांक १५३ मधील जागेची ‘गो-स्मशान’ म्हणून अधिकृत नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सावगावमधील विविध सर्वे क्रमांकांतील गायरान जमीन तसेच बेनकनहळ्ळी येथील सरकारी जमिनीचा ग्रामस्थांकडून अनेक दशकांपासून सार्वजनिक कारणांसाठी वापर केला जात आहे. जनावरांच्या चराईसाठी, गोदहनासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा उपक्रमांसाठी या जागांचा उपयोग होत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे या जमिनींचा मूळ सार्वजनिक वापर कायम ठेवून त्यांचे कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करू नये, अशी मागणी करण्यात आली.
बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी सांगितले की, २०२१ मध्ये ग्रामसभेत संबंधित जमीन गोमाळासाठी राखीव ठेवण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता या ठिकाणी सिटी-२ किंवा कचरा विल्हेवाटीचा कोणताही प्रकल्प उभारणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित जमीन धरणालगत असल्याने येथे कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारल्यास त्यातून निर्माण होणारे सांडपाणी किंवा दूषित घटक धरणाच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलप्रदूषण होऊन नागरिकांसह जनावरांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेषतः जनावरांच्या चराईसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या जमिनी व परिसराचे महत्त्व लक्षात घेता प्रस्तावित प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
सावगाव आणि बेनकनहळ्ळी येथील विद्यमान व माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकऱ्यांनी सरकारी गायरान जमीन सार्वजनिक वापरासाठी कायम राखावी आणि बेनकनहळ्ळी येथील जागेची ‘गो-स्मशान’ म्हणून नोंद करावी, अशी मागणी केली. यावेळी कल्लप्पा पाटील, मारुती काकतकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.








